मने जुळली नाहीत म्हणून..
मने जुळली नाहीत म्हणून शब्द जुळवण्याचा प्रयत्न करत आहे पण आजकाल ते ही एकमेकांशी जुळत नाहीत कदाचीत त्यांनाही अहंकार आड येत असावा... काही शब्द बोल्ड आहेत ठाम आहेत त्यांच्या विचारांवर तर काही आहेत इटॅलिक स्वच्छंदी, प्रवाहानुसार बदलणारे आणि अंडरलाईन मात्र दोघांना हवीय स्वतःच महत्व अधोरेखीत करण्यासाठी पण त्यांच्या या खेळात कविता मात्र भरकटलीय ... काही शब्द कर्सिव्ह इंग्लिश आहेत त्यांची सामाजिक किंमत जास्त आहे तर काही आहेत मराठी देवनागरी लिपीतील आपलेपणा ठासून भरलेला आहे त्यांच्यात पण त्यांच्या मिलनात काहीतरी मिसिंग वाटते नैसर्गिकपणा नसल्यावर गोष्टी निर्जीव वाटायला लागतात ... काही शब्द सरळ आहेत, ना काना ना मात्रा पण त्यांना त्याची पर्वा नाही तर काही शब्द आहेत, वेलांटी आणि उकारयुक्त पण त्यांना आस लागलीय जोडशब्द बनण्याची अशा वेळी त्यांच्या एकत्र येण्याने, व्याकरण मात्र फिकं पडतंय ... काही शब्द नामें आहेत स्वतःची ओळख त्यांनी जपली आहे तर काही शब्द ही सर्वनामे आहेत अवलंबून तर रहावं लागतं त्यांना नामांवरच पण त्यांच्या सोबत बसायला मात्र त्यांना जागा नाही ... - आशिष दहातोंडे (२६ जानेवारी २०१९)