मी बुद्ध आहे काळोखाचा

मी बुद्ध आहे काळोखाचा
अज्ञानातील सुख माझ्या नशिबी नाही

कळत नकळत अनेक मनं दुखावलीत
माझ्या अश्रूंची कर्ज दुसऱ्यांनी चुकवलीत

भूतकाळातल्या चुका दुरुस्त करायला भविष्याचा वेध घेतोय
भविष्याची चिंता भूतकाळातल्या आठवणींमध्ये विसरतोय
वर्तमानामध्ये मी जगत नाही...

स्वप्नांना प्रश्न विचारून निरुत्तर केलय
संथपणे विचारांचा रवंथ करून स्वप्नांना तिलांजली वाहिलीय

अनेक कविता मनामध्ये विरून श्रेष्ठत्वाला पावल्या
आज तिला कागदावर उतरवून तिचीपण किंमत कमी करतोय

कडवी जुळवण्याची आता इच्छा होत नाही
कविता आणि आयुष्याचं यमक जुळवण्याची तसदी मी आता घेत नाही

आयुष्याच्या तुटलेल्या आरशावर स्वतःची अनेक प्रतिबिंबे दिसतात
त्यातलं खरं प्रतिबिंब कोणतं, हेच आता कळत नाही...

- आशिष दहातोंडे (रावण)

Comments

Popular posts from this blog

मने जुळली नाहीत म्हणून..