नाते...

बहिण भावाचे नाते, आहे मोठे गमतीचे,
काटा भावाला टोचतो, पाणी तिच्या डोळा येते...
खेळताना हसताना, घरभर नाचताना,
रागे रागे कधीतरी भांडशील ना,
लटकेच खुदकन हसशील ना...

सुगरण माझी ताई, अन दादा मी शहाणा,
घर घेतो डोईवर, ताई दादाचा धिंगाणा,
तुझ्यासवे खेळताना, डावामध्ये हरताना,
दादा तुझा रडवेला पहाशील ना,
रागे रागे कधीतरी भांडशील ना...

माझी बहीण बहीण लाड माझे पुरवीते,
माझ्या वेदना पुसण्या माझी आई कधी होते,
घरामध्ये राबताना, आवडे तू सकलांना,
मनामध्ये माझ्या सुद्धा रहाशील ना,
रागे रागे कधीतरी भांडशील ना...

आज राखी बांधताना ताई मला ओवाळते,
गंध लावते कपाळी माझे आयुष्य वाढते,
तोंड गोड करताना, ताट हळू फिरताना,
काय होते मागीतले सांगशील ना,
रागे रागे कधीतरी भांडशील ना...

अंकुरले एका ठाई तुझे माझे बालपण ,
घेऊ वाटून दोघांत तुझी माझी आठवण,
पाठ तुझी राखताना ऋण थोडे फेडताना,
बाहुमध्ये माझ्या बळ देशील ना,
रागे रागे कधीतरी भांडशील ना...

अशी माझी ताई गुणी माझ्या घरी मोठी होते,
कष्ट सोसता सोसता तिच्या सासरला जाते,
वाट तुझी पहाताना भाऊबीज घालताना,
ओलावले डोळे माझे पुसशील ना,
रागे रागे कधीतरी भांडशील ना...

                           - कुंडलिक शिंदे
                                               www.facebook.com/pratik780
                                               www.facebook.com/PatrickWritesLife
                                               www.twitter.com/patrick0780
                                               www.instagram.com/patrick.writes

Comments

Popular posts from this blog

मने जुळली नाहीत म्हणून..

मी बुद्ध आहे काळोखाचा