आईचं पत्र.. (बाळा तुझी आठवण येतेय...)

        Hi, कसा आहेस? जेवण केलं? काय खाल्लं? तब्येत बरीये ना? तब्येतीची काळजी घे. बाहेरचं खात जाऊ नकोस. Call करत रहा. एवढ्या प्रश्नांमध्ये कळूनच गेलं असेल की मी कोण आहे.
        खूप दिवस झाले आपलं बोलणंच नाही झालं. म्हणजे मी call करते, पण तू busy असतोस. मग म्हणलं चला, बाळाला एक पत्रच लिहावं. म्हणजे तुला वेळ मिळाला तर वाचताही येईल आणि bore झालं की ठेऊनही देता येईल, मला वाईट न वाटता. हो म्हणजे bore होतं ना तुला आजकाल आपलं बोलणं... मी बडबड करत रहाते आणि तुला Important कामं असतात... मी ठेऊन देते मग फोन आणि बोलत रहाते तुझ्याशी... तासनतास... या सगळ्या बडबडीतून, या बोलण्यातून फक्त एकच सांगायचं असतं रे की, बाळा आठवण येतेय तुझी.. तुझी खूप, खूप आठवण येतेय...
        बाळा जेव्हा तुझी चाहूल लागली होती ना, पहिल्यांदा.. तेव्हा कोणालातरी पाहिलेलं नसतानाही प्रेम होऊ शकतं यावर माझा विश्वास बसला. तू दिसशील कसा, तू असशील कसा, एवढंच काय तू मुलगा असशील की मुलगी हे सुद्धा मला ठाऊक नव्हतं. तरी माझं नितांत प्रेम होतं तुझ्यावर. माझ्या शरीराचाच नाही, तर काळजाचाही भाग होता तू. आधी खाण्याच्या बाबतीत बिलकुल compromise  न करणारी मी, तुझ्यासाठी तिखट, गोड, जड खाणं अगदी विनातक्रार बंद केलं. तुझा जन्म झाला आणि माझं आयुष्यच बदलून गेलं. तुझं उठणं, तुझं झोपणं, तुझं खाणं-पिणं, तुझं खेळणं यात दिवस कसा निघून जायचा कळायचं सुद्धा नाही मला. तू किरकीर करून रात्रभर जागवायचास याचा कधी राग नाही आला मला आणि मी जेवण करत असताना तू शी केलीस तर तुझी शी धुवून पुन्हा त्याच हाताने जेवण करायची किळसही नाही आली कधी. तू जेव्हा तुझ्या तोंडून पहिल्यांदा आई म्हणाला होतास ना, तो क्षण आजही आठवतो मला...
        हळूहळू तू मोठा झालास आणि बदललास तू. "आई मला हे पाहिजे","आई मला ते दे ना" च्या ऐवजी "आई बावळट आहेस का गं तू","आई गप ना, तुला काय कळतंय यातलं" असलं काहीतरी बोलायला लागलास. तुला कधी बोलले नाही मी, पण तू असं काहीतरी बोलल्यावर रात्री अंथरुणात पडून रडताना माझा आवाज देखील येऊ द्यायचे नाही मी तुला.
        मान्य आहे मला की तुझं जग बदललंय. तुझं कॉलेज, तुझे मित्र-मैत्रिणी, तुझा अभ्यास, यात मला जागा थोडी कमीच आहे, पण माझ्यासाठी तू अजून बाळच आहेस रे.. अगदीच तास तास नाही पण दिवसातून निदान १० मिनीट तरी तुझ्याशी बोलावं, तुझी विचारपूस करावी असं वाटतं मला. महिन्या-दोन महिन्यातून घरी आल्यावर मला बिलगावंस, माझ्याजवळ बसून चार शब्द बोलावंसं असं वाटतं मला. लहानपणापासून तुझ्या सगळ्या इच्छा तू मागण्यापूर्वीच पूर्ण करणारी मी, एवढंही नाही मागू शकत का रे तुला?
        बाळा एक छोटंसं काम करशील माझं? पुढच्या वेळी मला फोन केल्यावर, "आई कशीयेस गं तू?" असं विचारशील मला? तोंडापुरतंच का होईना पण "आई तुझी खूप आठवण येतेय" असं म्हणशील का रे? पुढच्या वेळी घरी आल्यावर एक घट्ट मिठी मारशील मला?
        हे बघ, मी एकदा बोलायला लागले की बोलतच रहाते. सोड.. काळजी घे तुझी.. खुश रहा.. नेहमी...
                                                               
                                                                तुझी आणि फक्त तुझी,
                                                                             आई...

                                            -प्रतीक शिंदे (१० जानेवारी २०१९)
                                               www.facebook.com/PatrickWritesLife
                                               www.instagram.com/patrick.writes

Comments

  1. Chhan aathwan & aai sathi dilela time
    Nice line

    ReplyDelete
  2. मोठी होतात मुलं आई मोठी होत नाही! ✨
    खूप सुंदर शब्दांत तुम्ही आईची थोरवी व्यक्त केलीये. 🙌

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

मने जुळली नाहीत म्हणून..

मी बुद्ध आहे काळोखाचा