तू येऊच नकोस...

        दूरवर कुठेतरी, माझ्या इथून दिसणारही नाहीस अशा जगातली तू.. थोडा त्रासच होईल तुला, माझ्या जगात यायला... इतका दूरचा प्रवास करताना थकून जाशील तू आणि मागेही फिरशील कदाचीत.. तुझ्या सुखकर सोई-सुविधांपेक्षा इथलं ऊन जरा जास्तच बोचेल तुला.. तुझी चारचाकी गाडी यायला रस्ता सुद्धा नाहीये इथे.. तुला पायीच यावं लागेल. त्या काट्याकुट्याच्या रस्त्यावरून चालताना तुझं माझ्यावरचं प्रेम आटूनही जाईल बहुतेक.. तुला सवय नसेल पण माझ्या गावात शिरताना नाकाला रुमाल लावावा लागेल तुला.. गावात शिरल्यावर तुला लहान मुलं खेळताना दिसतील. त्यांच्या अंगावरच्या विरलेल्या कपड्यांना पाहून माझ्यावरचं तुझं प्रेमही विरेल... आश्चर्याने तुझ्याकडे पाहणारी ती मुले मागे टाकून पुढे जाशील आणि गावातली प्रत्येक नजर तुला राठ, कठीण आणि अरसिक वाटेल.. त्यातल्याच एखाद्या नजरेला माझा पत्ता विचारून माझ्या घराकडे येताना लाखो विचार येतील तुझ्या मनात आणि या विचारांमध्ये तुझं माझ्यावरचं प्रेमही वाहुन जाईल.. बांधावरून चालत येताना माझं झोपडीवजा घर पाहिलं की तुझी पावलं थबकतील, तुला तुझ्या प्रेमावर कीव येईल आणि आल्यावाटेने परत जायची इच्छाही होईल तुला.. घराजवळ आल्यावर बाहेर धुपत पडलेली चुल, मातीने शेकारलेल्या भिंती, मोरीची गटार अशी एकंदरीत दरिद्री परिस्थिती पहिली, की तुला तुझाच राग यायला लागेल आणि चटकन मागे फिरायची इच्छा होईल तुझी.. घरात आल्यावर अंधाऱ्या दोन खोल्या, कळकटलेल्या ढिसाळ भिंती, मंदिराच्या गाभाऱ्यासारखा दमट वास, बिनादुधाचा चहा पाहिला, की तुला तुझीच लाज वाटायला लागेल आणि धावत सुटशील तू, तुझ्या जगात, कायमची... मागे वळून पहायची इच्छाच काय पण तुला या आठवणी सुद्धा नकोशा वाटतील आणि तुझं माझ्यावरचं प्रेम शेवटचा श्वास घेईल...
        म्हणून सांगतो प्रिये, त्या तुझ्या मखमली, रंगीबेरंगी, ताज्यातवान्या जगाला मागे सोडून माझ्या या सुरकुतलेल्या, निरस, कुजलेल्या बेरंगी जगात, तू येऊच नकोस... तू येऊच नकोस..!!!

                                   -प्रतीक कुंडलीक शिंदे (११ एप्रिल २०१८)
                                      www.instagram.com/patrick.writes
                                      www.facebook.com/pratik780
                                      www.facebook.com/PatrickWritesLife
                                      www.twitter.com/patrick0780

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

मने जुळली नाहीत म्हणून..

मी बुद्ध आहे काळोखाचा