पाऊस...

        तशी माझी आणि पावसाची लहानपणापासूनची गट्टी.. दुष्काळातील शेतकऱ्याला नसेल तेवढी पावसाची ओढ मला असायची.. पावसाला मी माझं पहिलं प्रेम म्हणायचो.. वय वाढलं की प्रेम बदलतं वा कमी होतं म्हणतात पण माझं काही तसं झालं नाही.. लहानपणी होतं अगदी तेवढंच प्रेम होतं माझं पावसावर.. 'त्या' दिवसापर्यंत..
        कॉलेज मधला माझा पहिला पाऊस.. थंडगार वारा, पावसाच्या शांत सरी, मातीचा सुवास आणि 'ती'... उंची साधारण पाच फूट दोन इंच, कमरेपर्यंत येणारे दाट काळेभोर केस, सावळा उभट चेहरा, गोल मोठे डोळे आणि थोडीशी ढबरी.. पावसाला पहिलं प्रेम म्हणवणारा मी आडोशाला बसून चहा पीत बसलेलो असताना पावसाचे थेंब चेहऱ्यावर घेत रस्त्यावरून बेभान चालत असलेली 'ती' पाहिली आणि मलाच माझ्या पहिल्या प्रेमावर शंका यायला लागली... कदाचित पावसाने मला माझं दुसरं प्रेम मिळवून दिलं होतं...
        "जाई"... वाळवंटात तहानलेल्या माणसाला कोणीतरी गोड थंडगार सरबत द्यावा असंच काहीसं गोड नाव होतं तिचं.. ओळख झाली, मैत्री झाली आणि unlike all other stories, प्रेमही झालं.. आता सकाळची सुरुवात आणि दिवसाचा शेवट फक्त जाईच असायचा.. आमच्या दोघांच्या आवडीनिवडी खूपशा सारख्याच होत्या.. आणि आमचं पहिलं प्रेमही तेच.. पाऊस.. पण आपल्या प्रेयसीचं आपल्याशिवाय एखाद्या गोष्टीवर आपल्यापेक्षा जास्त प्रेम असणं माझ्यासारख्या possessive प्रियकरासाठी थोडं त्रासदायकच होतं..
        जाईचं आणि पावसाचं एक वेगळंच नातं होतं.. जाई 'आज पाऊस येणार वाटतं' म्हणायची आणि खरोखरच पाऊस यायचा.. जाई म्हणायची 'बघ, पावसाचंही माझ्यावर तितकंच प्रेम आहे'.. आणि हे ऐकून मला फार जळायला व्हायचं, आणि मला "जळकुड्या" म्हणून चिडवायला तिला अजून एक संधी मिळायची...
        तशा पावसाने मला जाईसोबतच्या खूपशा आठवणी दिल्या.. कधीतरी रात्री जेवण करून येताना पावसाच्या बहाण्याने share केलेली छत्री, पावसात सोबत पिलेला चहा, तिच्या हातची गरमागरम भजी... खूप काही...
        जाईला जाऊन आता जवळपास दोन वर्षे झाली.. आजकाल जाईची आठवण आणि पाऊस सोबतच येतात.. अभाळातले ढग आणि मनावरचं ओझं रिकामं होईपर्यंत राहतात आणि मग मी पुन्हा एकदा हातातला चहा खाली ठेऊन त्या 'पाच फूट दोन इंच' आकृतीच्या शोधात निघतो....!!
                                   -प्रतीक कुंडलीक शिंदे (14 फेब्रुवारी २०१8)
                                      www.facebook.com/pratik780
                                      www.twitter.com/patrick0780
                                      www.instagram.com/patrick.cpp

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

मने जुळली नाहीत म्हणून..

मी बुद्ध आहे काळोखाचा