काहीतरी राहून गेलं...

           ...आज "तिचा" वाढदिवस होता.. दुपारची सगळी कामं आवरून "ती" आपल्या आरामखुर्चीत बसली होती.. दररोजच्या सवयीनुसार हातात पेपर घेऊन त्यावर एक नजर टाकत "काय कलियुग आलंय बाई..." असं म्हणाली... आणि अचानक तीच लक्ष रेडिओ कडे गेलं.. रेडिओवर किशोर दा "जिंदगी के सफर में गुजर जाते है.." गात होते. तसं आज सकाळपासून तीचं कामात लक्षच लागत नव्हतं, पण या गाण्याने तिची घालमेल अजूनच वाढवली.. आरामखुर्चीत रेलून बसली आणि त्या "कोणाच्यातरी" आठवणीत "ती" 25 वर्षे मागे गेली...
           ..."फिरायला? काहीतरीच काय.. आत्ताच तर जाऊन आलो ना आपण बाहेर.. आठवडा पण नाही झाला अजून... पुन्हा जाऊ कधीतरी..." ती काही केल्या ऐकायला तयार नव्हती.. आता तो सुद्धा थकला होता... "बरं मग ऐक.. आपण ना सिनेमाला जाऊया.. 'आप की कसम' राजेश खन्ना आणि मुमताज... काय जोडी आहे यार... कालच release झालाय.. आणि उद्या तुझा वाढदिवस सुद्धा आहे.. आता नाही नको म्हणू प्लीज..." यावर मात्र तिने चटकन होकार दिला आणि दोघेही आपापल्या खोलीवर गेले..
           दुसऱ्या दिवशी दिवसभर कॉलेज करून ठरल्याप्रमाणे संध्याकाळी 8:30 वाजता "ती" त्यांच्या नेहमीच्या ठिकाणी थांबली होती... रोजच्या सवयीप्रमाणे "तो" थोडा उशिराच आला.. "काय रे... आज तरी वेळेवर यायचं ना.. बघ आता starting miss होईल आपली..." तिचं रागावणं चालू झालं.. "अगं वेळेवरच निघालो होतो.. पण ते थोडं..." "काही सांगू नकोस.. नेहमीची कारणं आहेत तुझी.. चल आता लवकर..." असं म्हणून तिने त्याचा हात हातात पकडला आणि पटपट टॉकीज कडे निघाली...
           Movie बघताना "जिंदगी के सफर में..." गाणं लागलं आणि त्याने तिच्याकडे पाहिलं... "बघ हा.. असाच निघून जाणारे तुझ्या आयुष्यातून मी.. आणि कितीही रडलीस तरी पुन्हा काही येणार नाही.." असं म्हणून तो मोठयाने हसायला लागला.. "जा ना.. मी कुठे अडवलंय तुला.. आणि हो, मी काही रडणार वगैरे नाही हं तुझ्यासाठी.." असं म्हणून ती सुद्धा हसायला लागली... movie संपला.. दोघेही रूमवर जायला निघाले...
           काहीतरी ठरवून, हिम्मत एकवटून त्याने खिशातून ring काढून तिच्यासमोर धरली.. "साथ देशील आयुष्यभर?" ती काहीच बोलली नाही... पण तिच्या पाणावलेल्या डोळ्यांनी त्याला उत्तर दिलं होतं.. "I'm sorry, मी पुन्हा हा विषय काढणार नाही.." तिनेही मानेने होकार दिला.. पण तिच्या मनात मात्र "अजून एकदा विचार ना रे... मी हो म्हणून टाकेल" हेच चाललं होतं..
           कॉलेज संपलं.. सगळेजण आपापल्या आयुष्यात रममान झाले.. तिचंही लग्न झालं... पण तब्बल २५ वर्षांनंतरही एक गोष्ट होती जी तिला आजही खात होती... "जर त्या दिवशी सगळी हिंमत एकवटून मी हो म्हणाली असती तर??".. तर कदाचीत आज सगळं काही वेगळं असतं?? नसतंही कदाचीत.. किंवा असूही शकलं असतं...
           दारावरची बेल ऐकून तिची तंद्री भंगली... हातातला पेपर बाजूला ठेवून तिने डोळ्यातलं पाणी पुसलं... आणि एक खोलवर श्वास घेऊन "जिंदगी के सफर में गुजर जाते है... वो फिर नही आते..." गुणगुणत दार उघडायला निघून गेली...
                           - प्रतीक कुंडलीक शिंदे (12 नोव्हेंबर 2017)
                                                www.facebook.com/PatrickWritesLife
                                                www.twitter.com/patrick0780
                                                www.instagram.com/patrick.cpp

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

मने जुळली नाहीत म्हणून..

मी बुद्ध आहे काळोखाचा