इथेच चुकतं वाटतं...!!

        ...पुस्तक खाली ठेऊन मोबाईल हातात घेतला आणि as expected, आलाच होता त्याचा message.. हल्ली मी मोबाईल घेतला आणि त्याचा message आलेला नसला ना की काहीतरी चुकल्या सारखं वाटतं इतकी सवय झालीये त्याची... अगदी त्याच्या "Good morning" पासून "Good night.. take care" पर्यंत सगळ्याची ओढ लागते आता... पण हे सांगायला मनच धजावत नाही.. इथेच चुकतं वाटतं... असो..
       त्याचा message आलाच होता.. नेहमीसारखाच.. "Ay..." आणि त्यावर माझा ठरलेला reply.. "Bol na.." त्याचं "ये चहा प्यायला" आणि माझं "हो आवरते, ये खाली हॉटेल मध्ये" आणि मग त्याचं "आलोच 15 min मध्ये" आणि माझं "bye"... अगदी typical बोलणं.. काय असतं यात माहिती नाही पण खरंच अगदी गोड वाटून जातं हे बोलणं सुद्धा.. पण त्याला मी हे कधीच जाणवू देत नाही.. त्याला काहीतरीच वाटेल असं वाटतं.. इथेच चुकतं वाटतं... असो..
        आता 15 min म्हणतोय म्हणजे अर्ध्या तासात नक्की येईल ही काळ्या दगडावरची रेघ... कधीकधी खूप राग येतो उशीर केल्यावर.. पण त्याची सवयच आहे तशी म्हणून मी सुद्धा सवयच लावून घेतलीये तो उशिरा येण्याची.. मीही आवरायला घेतलं.. त्याला भेटायला जाताना कितीही टाळलं तरी दहा वेळा आरशासमोर जाऊन मी कशी दिसतेय हे बघायचा मोह आवरतच नाही.. त्याला आवडतं म्हणून कित्येकदा उगाचच केस मोकळे सोडून जाते मी.. तो सुद्धा "खूप सुंदर दिसतेस तू आज" हे सांगायला विसरत नाही.. आणि मग अगदी काही फरक न पडल्यासारखी मी आतल्याआत खूप लाजून फक्त "Thanks" म्हणून मोकळी होते.. खरंतर मलाही कधीकधी म्हणावंसं वाटतं.. तुही खूप छान दिसतोयस आज.. पण का काय माहिती, एवढं धाडसच होत नाही.. आताही नाही झालं.. इथेच चुकतं वाटतं... असो...
           हॉटेल मध्ये जाऊन बसल्यावर "दादा, दोन कटींग.." ही ठरलेली order आणि मग त्याच्या न थांबणाऱ्या गप्पा.. देवाने त्याला बनवताना बडबड करण्याचं solution चुकून एखादी बादली जास्त टाकलं असावं असं वाटतं कधीकधी.. मी सुद्धा खूप बोलकी आहे, पण त्याच्या समोर गेल्यावर फक्त त्याचं ऐकावंस वाटतं.. इकडच्या तिकडच्या गप्पा मारताना "उद्या सुट्टी आहे.. काही plan?" असा प्रश्न येतो आणि मला पुढचा प्रश्न माहिती असल्याने मी सुद्धा "तसं काही विशेष काम नाही उद्या" म्हणून टाकते... "मग कुठेतरी फिरायला जाऊया का?" तो विचारतो आणि मग अगदी जिभेवर आलेला होकर गळ्याखाली लोटून मी "नको अरे.. पुन्हा कधीतरी जाऊ" असं म्हणते आणि माझाच मला राग यायला लागतो.. मनातल्या मनात "पुन्हा एकदा विचार ना रे, मी हो म्हणेल" असं काहीसं चालू असतं.. पण तो सुद्धा पुन्हा नाही विचारत.. आता पुढच्या वेळी मीच "ए चल ना कुठेतरी फिरायला जाऊ" म्हणेल असं ठरवते आणि ते कधीच बोलत नाही.. आताही नाही बोलले... इथेच चुकतं वाटतं... असो...
           चहा घेऊन 1 तास झालेला असतो, आणि हॉटेल वाला दादा "आता यांना चहा सोबत बसायचं भाडं मागू की काय" अशा नजरेने पहात असतो.. मग चल ना बाहेर कुठेतरी बसू असं म्हणून आम्ही बाहेर निघतो.. आणि पुन्हा एकदा त्याची अखंड बडबड सुरू होते.. आता सूर्यदेव आराम करायला निघतात आणि मीही "चल आता जाते मी" असं म्हणून जायला निघते.. माझ्या नजरेतलं "अजून थोडा वेळ थांबायचंय रे पण सवय होऊन जाईल तुझी" हे त्याला वाचता येत नाही असं नाही.. आणि त्याच्या नजरेतलं "अगं थांब ना जराशी.. होउदे सवय झाली तर" हे मला वाचता येत नाही असंही नाही.. पण तरीही दोघे जायला निघतो.. रूम कडे परत जाताना खूपदा मागे वळून त्याला पुन्हा एकदा पाहावंसं वाटतं.. पण "मी त्याला पाहतेय हे जर त्याने पाहिलं तर?" या विचाराने मी कधीच मागे वळून पहात नाही.. आताही नाही पाहिलं... इथेच चुकतं वाटतं... असो...
         आत्ता त्याची आठवण येतेय, online सुद्धा आहे तो.. "तुझी खूप आठवण येतेय रे, भेटायला येशील का आत्ता?" असा message type करून ठेवलाय पण send वर click करण्याएवढी हिम्मतच जमा होत नाही कधी.. एवढ्या वेळी जाऊदे.. पण पुढच्या वेळी त्याला हा message नक्की send करिन असं मनातल्या मनात ठरवते आणि हा messages त्याला कधीच send करत नाही.. आताही नाही केला.. इथेच चुकतं वाटतं... नाही, खरंच... इथेच चुकतं...
         आता ही चूक करायची नाही.. "पुढच्या वेळी भेटले की त्याला हे सगळं सांगायचं आणि मोकळं व्हायचं एकदाचं" असं ठरवते पण कधीच सांगत नाही.. आजही नाही सांगितलं.. इथेच चुकतं वाटतं.... इथेच चुकतं...
                                              - प्रतीक कुंडलीक शिंदे (15 ऑक्टोबर 2017)
                                                 www.facebook.com/pratik780
                                                 www.twitter.com/patrick0780
                                                 www.instagram.com/patrick.cpp

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

मने जुळली नाहीत म्हणून..

मी बुद्ध आहे काळोखाचा